कोंढवा-टिळेकरनगर-येवलेवाडी परिसरातील अनधिकृत भूखंड विक्री व बांधकामांवर PMC ची कारवाईची तयारी!

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:
पुणे :(प्रतिनिधी) कोंढवा, टिळेकरनगर, येवलेवाडी, पिसोळी (ता. हवेली, जि. पुणे) या परिसरात मोठ्या प्रमाणावर परवानगीशिवाय प्लॉटिंग (भूखंड फाटणी) करून भूखंडांची बेकायदेशीर विक्री होत असल्याचे PMC च्या निदर्शनास आले आहे. जमिन विकासाची कोणतीही वैध परवानगी न घेता सर्रासपणे प्लॉटिंग करून नागरिकांना फसवले जात आहे. या संदर्भात पुणे महानगरपालिका (बांधकाम विभाग) शहर अभियंता यांनी थेट कारवाईचे संकेत दिले आहेत.
विशेष म्हणजे कोंढवा व टिळेकरनगर भागात अनधिकृत प्लॉटिंग सोबतच बेकायदेशीर बांधकामांनाही मोठ्या प्रमाणावर उत आला असून, आरक्षित हिलस्लोप / हिलटॉप जागांवर अशी बांधकामे उभारली जात असल्याची माहिती PMC च्या विकास विभागाला मिळाली आहे. त्यामुळे अशा भूखंडांवर होणारी कोणतीही बांधकामेही बेकायदेशीर ठरणार असून त्यावर महापालिकेच्या वतीने कठोर कारवाई करण्यात येणार आहे.
PMC च्या जाहीर सूचनेनुसार, या सर्व प्रकारांवर वेळोवेळी कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे कोणत्याही नागरिकांनी असे अनधिकृत भूखंड किंवा प्लॉटिंग खरेदी करू नये, अन्यथा भविष्यात नुकसान व मनस्ताप सहन करावा लागू शकतो, असा स्पष्ट इशारा महापालिकेने दिला आहे.
नागरिकांनी कोणताही भूखंड खरेदी करताना संबंधित जमिनीची वैध मालमत्ता कागदपत्रे, नगररचना परवानगी, झोनिंग व बांधकाम परवानग्या मिळाल्या आहेत की नाही याची खातरजमा करावी. कोणत्याही बेकायदेशीर प्लॉटिंग किंवा अनधिकृत बांधकामांपासून दूर राहावे. चुकीच्या गुंतवणुकीमुळे भविष्यात मोठ्या नुकसानाला सामोरे जावे लागू शकते. नागरिकांनी सतर्क राहूनच निर्णय घ्यावा.