Uncategorized

आई दप्तर घेऊन येणार आहे ना? चिमुकली वाट बघत बसली, आईचा मृतदेह आला घरी

दिपसागर न्यूज ऑनलाइन पोर्टल सेवा:

पुणे (मार्केट यार्ड ): गंगाधाम चौकात बुधवारी सकाळी हृदयद्रावक अपघात घडला. शाळेच्या दप्तराची खरेदी करून घरी परतणाऱ्या महिलेचा भरधाव ट्रकच्या धडकेत जागीच मृत्यू झाला, तर दुचाकीस्वार सासरे गंभीर जखमी झाले. या अपघाताने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

मार्केटयार्ड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गंगाधाम चौकात सकाळी सव्वाअकराच्या सुमारास सिग्नल सुटताच ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दीपाली युवराज सोनी (वय २९) यांचा जागीच मृत्यू झाला. त्या मार्केटयार्डमधील एका शाळेतून आपल्या मुलीचे शालेय साहित्य घेऊन घरी परतत होत्या. त्यांच्या दुचाकीवर सासरे जगदीश पन्नालाल सोनी (वय ६१, रा. झाला कॉम्प्लेक्स समोर, शनेश्वर बंगला, गंगाधाम चौक) हे चालक होते.

सिग्नल सुटताच ते बिबवेवाडीच्या दिशेने वळत असताना मागून भरधाव वेगात येणाऱ्या ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. दीपाली यांच्या डोक्यावरून ट्रकचे चाक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर जगदीश सोनी हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

अपघातानंतर गंगाधाम चौक परिसरात नागरिकांची गर्दी झाली. त्यामुळे या भागातील वाहतूक काही काळ विस्कळित झाली होती. या प्रकरणी ट्रक चालक शौकत आली पापालाल कुलकुंडी (वय ५१, रा. भवानी पेठ, पुणे) याला अटक करण्यात आली असून, भारतीय न्याय संहिता कलम १०५ अन्वये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वर्षभरात दुसरा दुर्दैवी अपघात…

ही घटना घडलेल्या गंगाधाम चौकात वर्षभरापूर्वीही अशीच दुर्दैवी दुर्घटना घडली होती. १२ जून २०२४ रोजी भरधाव डंपरने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली होती. त्या अपघातात सासू दमयंती भूपेंद्र सोळंखी (वय ५९, रा. गंगाधाम-कोंढवा रस्ता) यांचा मृत्यू झाला होता, तर त्यांची सून प्रियंका राहुल सोळंखी (वय ३३) गंभीर जखमी झाली होती. त्या दोघी बाजारात घरगुती साहित्य खरेदीसाठी जात होत्या. मृत्यूंजय मंदिराकडून गंगाधाम चौकात उतरत असताना हा अपघात घडला होता.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button