Uncategorized

वन टाईम मेंटेनन्सचे पैसे घेतले… पण सुख-सुविधा गायब!”

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:

पुणे, कोंढवा (प्रतिनिधी):
कोंढवा येथील टिळेकरनगरमधील द्वारिका धाम सोसायटीमधील फ्लॅटधारक सध्या अडचणींच्या भोवऱ्यात अडकले आहेत. फ्लॅट खरेदी करताना बिल्डरकडून देण्यात आलेली आकर्षक आश्वासने, रंगीबेरंगी सुखसुविधांची स्वप्ने, आणि ‘वन टाइम मेंटेनन्स’च्या नावाखाली गोळा केलेली भरमसाठ रक्कम – हे सगळं आता नागरिकांना एका योजनाबद्ध फसवणुकीसारखं वाटू लागलं आहे.

फ्लॅट विक्रीच्या वेळी क्लब हाउस, जिम, स्विमिंग पूल, गार्डन, दर्जेदार लिफ्ट, चोवीस तास सुरक्षा सीसीटीव्ही कॅमेरे अशा विविध सुविधा दिल्या जातील, असे मोठमोठे वादे बिल्डरने ग्राहकांना केले होते. मात्र प्रत्यक्षात या पैकी अनेक सुविधा अस्तित्वातच नाहीत आणि जे काही आहे त्याचा दर्जाही अत्यंत निकृष्ट आहे.

या समस्यांबाबत बिल्डिंग मधील सर्व सभासदांनी एकत्र येऊन बिल्डरकडे वेळोवेळी लेखी तक्रारी व विनंती पत्राद्वारे पाठपुरावा केला. परंतु बिल्डरकडून सातत्याने दुर्लक्षच केले गेले असून कोणतीही ठोस पावले उचलण्यात आलेली नाहीत. नागरिकांच्या मते, बिल्डरकडून जाणूनबुजून सोयी-सुविधांकडे दुर्लक्ष केले जात असून नागरिकांच्या विश्वासाशी खेळ करण्यात आला आहे.

सध्या सोसायटीत फक्त एकच वॉचमन असून, सुरक्षा व्यवस्थेचा पुरता बोजवारा उडाला आहे. लिफ्ट सतत बंद पडते आणि बिघडते, ओपन पार्किंगमध्ये कोणतेही निश्चित क्रमांक नसल्याने वाहनांच्या पार्किंगमध्ये मोठा गोंधळ निर्माण होतो. बाथरूममधील फ्लश टँकमध्ये पाणी येत नाही, गरम पाणी वेळेवर मिळत नाही.कचरा वेळेवर उचलला जात नाही बिल्डिंगमध्ये अस्वच्छता असून याशिवाय, सोसायटीच्या कॉमन मीटरमधून इतरत्र वीज वापर होत असल्याच्या तक्रारीही सतत येत आहेत.

महत्त्वाचे म्हणजे, ‘वन टाइम मेंटेनन्स’ घेतल्यानंतरदेखील दरमहा किती खर्च होतो, त्याचा कोणताही पारदर्शक हिशोब फ्लॅटधारकांना दिला जात नाही. त्यामुळे या रकमेचा उपयोग नेमका कशासाठी केला जातो, हा प्रश्न अनुत्तरित आहे. बिल्डर केवळ पैसे उकळतो आणि जबाबदारी झटकतो, अशी भावना नागरिकांमध्ये आहे.

या पार्श्वभूमीवर द्वारिका धाममधील सर्व सभासदांनी एकत्र येऊन कायदेशीर मार्गाने लढा देण्याचा निर्धार केला आहे. “पैसे घेतले तर सुविधा द्याव्यात, अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल,” असा ठाम इशारा सोसायटीतील नागरिकांनी दिला आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button