“महिला सशक्तीकरणासाठी एकवटले कर्तव्यदक्ष हात; पुण्यात भव्य बाईक रॅलीद्वारे जागरूकतेचा संदेश”

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:
पुणे शहर (प्रतिनिधी,) 08 मार्च 2025:
जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत, पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 तर्फे महिलांच्या सशक्तीकरणाला चालना देण्यासाठी भव्य बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. यावेळी महिलांच्या हक्क, योगदान आणि त्यांच्या सामर्थ्याला अधोरेखित करण्याचा प्रयत्न रॅलीच्या माध्यमातून करण्यात आला.
“बेटी बचाओ, बेटी पढाओ” (BBBP) या महत्त्वाकांक्षी उपक्रमाला बळकट करण्याच्या उद्देशाने पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 मधील महिला पोलिस अधिकारी आणि अंमलदारांनी एकत्र येत या भव्यदिव्य रॅलीत सहभाग नोंदवला.
सकाळी 10:30 वाजता महाराष्ट्र फुले सांस्कृतिक भवन, वानवडी येथून रॅलीला उत्साहात सुरुवात झाली. ही रॅली एस.एम. जोशी कॉलेज, हडपसर मार्गे पुन्हा सांस्कृतिक भवन येथे समाप्त करण्यात आली. रॅलीच्या माध्यमातून महिलांच्या सुरक्षिततेविषयी जनजागृती आणि महिलांच्या सशक्तीकरणाचा बुलंद संदेश देण्यावर भर देण्यात आला.
रॅलीमध्ये पोलीस उपायुक्त परिमंडळ 5 मधील तब्बल 222 महिला पोलिस अधिकारी आणि अंमलदारांनी 116 मोटारसायकलींसह सहभाग नोंदवला. या उपक्रमाला समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी देखील अभूतपूर्व पाठिंबा दर्शविला.
कार्यक्रमाचे उद्घाटन आणि रॅलीला हिरवा झेंडा दाखवण्याचे कार्य प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर पुष्कर जोग, सुप्रसिद्ध गायक अवधूत गुप्ते आणि अभिनेत्री गिरीजा ओक-गोडबोले यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी महिलांच्या सशक्तीकरण, सामाजिक उत्तरदायित्व आणि महिलांच्या अधिकारांसाठी आवाज उठवण्याची गरज यावर मोलाचे मार्गदर्शन केले. महिलांनी आपल्या हक्कांसाठी नेहमी पुढे राहावे, समाजात आपला ठसा उमटवावा आणि सर्वांसाठी प्रेरणादायी ठरावे, असा सकारात्मक संदेश त्यांनी दिला.
परिमंडळ 5 चे पोलिस उपायुक्त डॉ.राजकुमार शिंदे यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलिस अधिकारी आणि अंमलदारांनी उत्साहात सहभाग नोंदवत समाजापुढे एक प्रेरणादायी आदर्श ठेवला.
रॅलीदरम्यान महिलांच्या सुरक्षितता, शिक्षण, स्वावलंबन आणि हक्कांबद्दल जनजागृती करण्यावर भर देण्यात आला. महिलांच्या हक्कांसाठी पोलिस दल सदैव तत्पर आहे, याचा सुंदर आदर्श या रॅलीच्या माध्यमातून समाजासमोर ठेवण्यात आला.
संपादक विजयसिंह गायकवाड मो. नं.9834099800