Uncategorized

पर्वती मतदारसंघात एकाच नावाच्या तीन महिला उमेदवार

दिवसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा ;

पुणे: पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये दाखल अर्जांच्या छाननीत बुधवारी दोन उमेदवारांचे अर्ज बाद झाले असून, 20 अर्ज वैध ठरले आहेत. त्यामध्ये पक्षांचे पाच उमेदवार असून, 15 उमेदवारांचे अपक्ष अर्ज आहेत. उमेदवारी अर्ज 4 नोव्हेंबरपर्यंत मागे घेतले जाणार असल्याने त्याच दिवशी लढतीचे नेमके चित्र स्पष्ट होईल. दरम्यान, वैध अर्जांमध्ये तीन महिला उमेदवार एकाच नावाच्या असल्याचे समोर आल्याने मतदारांमध्ये गोंधळ उडण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे

महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस  शरदचंद्र पवार पक्षाकडून अश्विनी नितीन कदम (अरण्येश्वर) यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. या शिवाय अपक्ष उमेदवारांमध्ये अश्विनी अनिल कदम (जनता वसाहत) आणि अश्विनी नितीन कदम (हिंगणे खुर्द) या दोन महिला उमेदवारांचाही समावेश आहे. तीनही उमेदवारांचे नाव आणि आडनावही एकच असल्याने मतदारांमध्ये गोंधळ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

दरम्यान, भारतीय जनता पार्टीकडून माधुरी सतीश मिसाळ, तर अन्य नोंदणीकृत राजकीय पक्षाच्या उमेदवारांमध्ये संभाजी बि—गेड पार्टीचे अविनाश अशोक घोडके, वंचित बहुजन आघाडीच्या गायकवाड सुरेखा मगरध्वज, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (ए) रवींद्र शरद क्षीरसागर यांचा समावेश आहे. तर अन्य उमेदवारांचे अपक्ष अर्ज आहेत. दरम्यान, निवडणूक अर्ज छाननीमध्ये प्रकाश कीर्तीसिंग चौधरी आणि सुनीता रामचंद्र किरवे हे दोन अर्ज बाद झाल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनोजकुमार खैरनार यांनी दिली.

अश्विनी नितीन कदम (उमेदवार, महाविकास आघाडी)

निवडणूक आयोगाकडून मतदारांना सावधानतेने मतदान करण्याचा सल्ला देण्यात यावा अथवा वेगळा काही उपाय करता येईल का ते पाहावे. जेणेकरून एकसारख्या नावामुळे कोणताही गोंधळ होणार नाही, याची काळजी घ्यावी. पर्वतीमधील मतदारांनी मतदान करताना नीट लक्ष देऊन उमेदवाराचे पूर्ण नाव, पक्ष व चिन्ह तपासून मतदान करावे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button