कोंढवा खुर्दमध्ये PMC ची कारवाई; अनधिकृत आठमजली इमारत जमीनदोस्त

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:
संपादक: विजयसिंह गायकवाड
पुणे (प्रतिनिधी) – कोंढवा खुर्द परिसरातील जे.के. पार्कजवळ बांधण्यात आलेल्या अनधिकृत आठमजली आरसीसी इमारतीवर पुणे महापालिकेने धडक कारवाई करत ती जमीनदोस्त केली. महापालिकेच्या विशेष पथकाने शनिवारी सकाळपासून ही मोहीम राबवत सुमारे पाच हजार चौ.फुट क्षेत्रातील बांधकाम पाडले.
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित बांधकाम कोणत्याही अधिकृत परवानगीशिवाय उभारले गेले होते. या संदर्भात पूर्वी नोटीस बजावण्यात आली होती. त्यानंतर ठरवून दिलेल्या मुदतीनंतर थेट पाडकामाची कारवाई करण्यात आली.
या मोहिमेत १० कामगार, पाच पोलिस कर्मचारी, एक जेसीबी मशीन, चार ब्रेकर, दोन गॅस कटर तसेच चार कनिष्ठ अभियंते आणि दोन सहाय्यक अभियंते सहभागी झाले होते. अवैध संरचना पाडल्यानंतर अवशेष पूर्णपणे हटवण्याचे काम सुरू आहे.
महापालिकेने नागरिकांना इशारा दिला आहे की, या ठिकाणी कोणताही व्यवहार करू नये किंवा अवशिष्ट इमारतीत प्रवेश करू नये. भविष्यात फ्लॅट खरेदी करताना बांधकामाची कायदेशीर कागदपत्रे, परवाने आणि मंजुरी तपासूनच व्यवहार करावा, असे आवाहनही करण्यात आले आहे.
कोंढवा परिसरात अशा अनधिकृत बांधकामांविरुद्ध महापालिकेची मोहीम सुरू असून, येत्या काळात आणखी कडक कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. काही प्रकरणांमध्ये न्यायालयीन स्थगितीमुळे कारवाई थांबवावी लागत असली तरी अवैध बांधकामांविरुद्ध PMC चा हल्ला सुरू राहणार आहे.