यवतच्या नीलकंठेश्वर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मूर्तीची विटंबना – गावात संतापाची लाट
आरोपी अजून फरारअसून पोलिस त्याचा शोध घेत आहेत

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा :
यवत (ता. दौंड) – येथील नीलकंठेश्वर मंदिरात उभारलेली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती कुण्या अज्ञात तरुणाने विटाळल्याचा संतापजनक प्रकार बुधवारी मध्यरात्री उशिरा घडला. गुरुवारी सकाळी पूजेसाठी आलेल्या पुजाऱ्याच्या निदर्शनास हा प्रकार येताच गावात एकच खळबळ उडाली.
घटनेची माहिती काही क्षणांत गावभर पसरली आणि नागरिकांच्या भावना तीव्रतेने उफाळून आल्या. शेकडो ग्रामस्थांनी मंदिर परिसरात एकत्र येत घटनेचा तीव्र निषेध नोंदवला. या संतप्त प्रतिक्रिया उमटताच गावातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने तत्काळ बंद करत निषेधात सहभागी होण्याचा निर्णय घेतला.
या घटनेमुळे संपूर्ण यवत गावात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. आरोपी अद्याप फरार असून, पोलिसांनी शोधमोहीम राबवली आहे. घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी बापूसाहेब दडस यांनी भेट दिली असून यवत पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तपासासाठी सतर्क झाले आहेत.
दरम्यान, ग्रामस्थांत संतापाची लाट आहे. “शिवरायांचा अवमान सहन केला जाणार नाही,” असा इशारा स्थानिक युवकांनी दिला आहे. यवत गावात सध्या पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासन दक्ष आहे.
या घटनेने शिवभक्तांच्या भावना दुखावल्या असून आरोपीस तातडीने अटक करून कठोरात कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांतून होत आहे.