Uncategorized

लोणी‑काळभोरमध्ये घरफोडी करणारा सराईत चोर मध्यप्रदेशातून अटकेत; सहा लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

दिपसागर न्यूज ऑनलाइन पोर्टल सेवा :

लोणी‑काळभोर (ता. हवेली) – लोणी स्टेशन परिसरातील पठारे वस्ती येथील एका बंद घरात झालेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी सराईत गुन्हेगाराला मध्यप्रदेशातून अटक केली असून, त्याच्याकडून ६ लाख ३९ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

घरमालक शौकत शब्बीर मोगल हे काही कामानिमित्त दोन दिवसांसाठी बार्शी येथे गेले होते. घरी परतल्यानंतर त्यांनी पाहिले असता मुख्य दरवाजाचे कुलूप तुटलेले आणि घरातील तिजोरी फोडलेली होती. सोन्याचे दागिने, रोख रक्कम व मोबाईल चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ लोणी‑काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना मिळालेल्या तांत्रिक माहितीच्या आधारे आणि गुप्त बातम्यांवरून संशयिताचा शोध सुरू करण्यात आला. यावेळी पोलिसांनी मध्यप्रदेशातील खंडवा जिल्ह्यातून प्रतिक हिराचंद लिडकर (वय ३१, रा. रामनगर, खंडवा) याला ताब्यात घेतले. त्याच्या झडतीत चोरी केलेले दागिने, रोख रक्कम आणि मोबाईल असा एकूण ६ लाख ३९ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

प्रतिक लिडकर हा अत्यंत सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर महाराष्ट्र आणि मध्यप्रदेशमध्ये चोरी, जबरी चोरी, घरफोडी असे मिळून १५ हून अधिक गुन्हे दाखल असल्याचे तपासात उघड झाले आहे. पोलिसांकडून त्याच्या इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. या कारवाईमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक, तपासी अधिकारी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे कर्मचारी सहभागी होते.

घटनेने परिसरात पुन्हा एकदा घरफोडीच्या वाढत्या घटनांबाबत चिंता निर्माण झाली असून, पोलिसांकडून नागरीकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अटक केलेल्या आरोपीविरुद्ध पुढील तपास सुरू असून न्यायालयात त्याला हजर करण्यात येणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button