पुण्यातील कोंढवा भागातील या इमारतीमध्ये सदनिका घेतल्यास फसवणूक होईल, महापालिकेने केले जाहीर !

दिपसागर न्यूज ऑनलाइन पोर्टल सेवा :
पुणे : कोंढवा परिसरातील अनधिकृत इमारतींवर पुणे महापालिकेने मोठी कारवाई सुरू केली असून, नागरिकांनी अशा ठिकाणी घर खरेदी करू नये, असे स्पष्ट आवाहन करण्यात आले आहे.
महापालिकेच्या बांधकाम विभागाने नुकत्याच केलेल्या तपासणीत कोंढवा परिसरात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू असल्याचे निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर दोन इमारती जमीनदोस्त करण्यात आल्या असून, सुमारे ३,८०० चौरस फुटांचे बेकायदा बांधकाम निष्कासित करण्यात आले आहे.
४० अभियंत्यांची नियुक्ती – कडक कारवाईचा निर्धार
शहर अभियंता प्रशांत वाघमारे, अधीक्षक अभियंता राजेश बनकर व उप अभियंता दीपक सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरू असून, एकूण ४० अभियंत्यांचे पथक यासाठी कार्यरत आहे.
महापालिकेच्या तपासणीत कोंढवा परिसरात सुमारे ७० ते ८० अनधिकृत बांधकामे आढळून आली आहेत. काही इमारतींमध्ये नागरिक वास्तव्यास आहेत. अशा इमारती रिकाम्या करण्यासाठी पोलिस प्रशासनाची मदत घेतली जाणार आहे.
फ्लॅट घेतल्यास फसवणुकीची शक्यता!
कोंढव्यात अनेक ठिकाणी परवानगीशिवाय चार मजली इमारती उभारल्या गेल्या आहेत. या ठिकाणी फ्लॅट व दुकाने विक्रीस काढण्यात आली असून, कमी दरात उपलब्ध असल्यामुळे नागरिकांकडून खरेदीसाठी गर्दी होत आहे. मात्र या व्यवहारांमध्ये फसवणूक होण्याची शक्यता असल्याने PMC ने नागरिकांना इशारा दिला आहे.
बेकायदा बांधकामांविरोधात गुन्हे दाखल होणार
या इमारती दाट वस्तीतील असल्याने कारवाई काळजीपूर्वक केली जात आहे. पुढील १-२ महिन्यांत सर्व अनधिकृत इमारती हटवण्यात येणार असून, संबंधित बांधकाम व्यावसायिकांविरोधात गुन्हे दाखल करण्यात येणार असल्याचे महापालिकेने स्पष्ट केले आहे.