गुलटेकडीतील बेकायदेशीर बांधकामाचा गंभीर प्रकार उघड – दूषित पाणी थेट कॅनलमध्ये, नागरिकांच्या आरोग्याला धोका

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:
पुणे :(दिपसागर न्यूज प्रतिनिधी)
गुलटेकडी डायस प्लॉट येथील गुलमोहर अपार्टमेंटच्या पुनर्विकास प्रकल्पात सार्वजनिक आरोग्य व कायद्याची पायमल्ली करणारी घटना समोर आली आहे. माजी नगरसेविकेच्या पुतण्याच्या सहकार्याने सुरू असलेल्या या प्रकल्पातील साईटवरून थेट पाटबंधारे जलसंपदा विभागाच्या कॅनलमध्ये मोठ्या पाइपलाईनद्वारे घाण व दूषित ड्रेनेज पाणी सोडले जात असल्याचा गंभीर प्रकार उघड झाला आहे.
ही बाब निदर्शनास आल्यानंतर स्थानिक सामाजिक कार्यकर्ते महादेव गायकवाड व ईश्वर आढाव (RPI) यांनी संबंधित बांधकाम व्यावसायिक आणि त्यांच्या सहकाऱ्यांना जाब विचारला असता, त्यांनी “परवानगी आहे” असे सांगून विषय टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र जेव्हा प्रत्यक्ष परवानगी दाखविण्याची मागणी करण्यात आली, तेव्हा त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली आणि कोणतीही कागदपत्रे सादर केली नाहीत.
महानगरपालिकेकडे लेखी तक्रार; अद्याप कारवाई नाही
संपूर्ण प्रकाराबाबत पुणे महानगरपालिकेचे सहाय्यक आयुक्त बिबेवाडी क्षेत्रिय कार्यालय यांच्याकडे औपचारिक लेखी निवेदन सादर करण्यात आले आहे. मात्र नागरिकांनी वारंवार तक्रारी करूनही अद्याप कोणतीही ठोस कारवाई प्रशासनाच्या वतीने झालेली नाही, हे अधिक चिंतेचे आहे.
रात्रभर सुरू असलेल्या कामामुळे नागरिक त्रस्त
या प्रकल्पामध्ये रात्री-अपरात्री काम सुरू ठेवले जात असल्यामुळे आजूबाजूच्या नागरिकांची झोपमोड होत आहे. मोठ्या मशिनरीच्या आवाजाने नागरिकांना रात्री झोपेतून जागे व्हावे लागत असून, अनेक वयोवृद्ध आणि लहान मुलांचे आरोग्य यामुळे बिघडत चालले आहे. दुसरीकडे, नाल्याच्या पाण्यात घाण मिसळल्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि डासांचा त्रास मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे.
नियमांची पायमल्ली व नागरिकांच्या जीवितास धोका
हा संपूर्ण प्रकार बेकायदेशीर असून, संबंधित अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. पाण्याचे स्रोत आणि जलवाहिनी दूषित होत असल्यामुळे ही बाब अधिक गंभीर ठरते.
स्थानिक कार्यकर्ते विविध पक्षाचे पदाधिकारी यांची प्रशासनाकडे ठाम मागणी करते
या प्रकाराची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी. पाटबंधारे विभागाच्या कॅनलमध्ये पाणी सोडण्याची परवानगी दिली आहे का, याची चौकशी करण्यात यावी.
रात्रीच्या वेळेत सुरू असलेल्या कामांवर त्वरित बंदी आणण्यात यावी. पर्यावरण आणि आरोग्य विभागाकडून संपूर्ण परिसराची तपासणी करून अहवाल प्रसिद्ध करण्यात यावा.
या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्यास येत्या काळात नागरिकांचा संयम सुटू शकतो व मोठे आंदोलन छेडले जाऊ शकते, याची जबाबदारी प्रशासनावर राहील.