सामाजिक जबाबदारीची नाळ… पाटस व्यापाऱ्यांची वारकऱ्यांसाठी सेवा!

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:
पाटस प्रतिनिधी : संजय पवार
दौंड तालुक्यातील कसबे पाटस येथे बुधवार, दिनांक २५ जून रोजी संतश्रेष्ठ श्री संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचे भव्य स्वागत करण्यात आले. यावेळी पाटस व्यापारी संस्थेच्या वतीने वारकरी बंधूंसाठी बिस्किट व थंड पाण्याचे वाटप करत एक सामाजिक बांधिलकी जपत आदरयुक्त सेवा करण्यात आली.
सालोंसाल पार पडणाऱ्या या उपक्रमाला यंदाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. पाटस व्यापारी संस्था गेल्या पाच वर्षांपासून हा उपक्रम यशस्वीरित्या राबवत असून, यामध्ये पाटस मधील सर्व व्यापारी बंधू सक्रियपणे सहभागी होतात. काही व्यापारी बांधव संस्थेकडे स्वतःहून बिस्किट व पाण्याचे बॉक्स जमा करतात, तर काही प्रत्यक्ष उपस्थित राहून सेवाकार्यात योगदान देतात. हा उपक्रम म्हणजे नुसतीच एक सेवा नव्हे, तर वारकरी परंपरेप्रती असलेली निष्ठा आणि श्रद्धेचे प्रतिक आहे.
कार्यक्रमाचे उद्घाटन पाटस ग्रामपंचायतच्या सरपंच सौ. तृप्ती भंडलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य विनोद कुरुमकर, गणेश जाधव, राजू गोसावी, जुनेत तांबोळी, संतोष गावडे, नानासाहेब मस्के, गौतम पानसरे, दत्ता सोनवणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटस व्यापारी संस्थेचे संचालक, पदाधिकारी, सर्व व्यापारी बंधू आणि ग्रामस्थ यांनी या पुण्य कार्यात उत्साहाने सहभाग घेतला.
हा उपक्रम पाटसच्या व्यापारी वर्गाच्या सामाजिक जाणीवेचे प्रतीक ठरत असून, अशा उपक्रमांद्वारे व्यापारी वर्ग समाजाशी आपली नाळ कायम जोडून ठेवत असल्याची सकारात्मक भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.
— वारकरी सेवा हीच खरी व्यावसायिक प्रतिष्ठा, हेच पाटसच्या व्यापाऱ्यांनी यशस्वीपणे दाखवून दिलं आहे!