पारगाव ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. सुनिता विठ्ठल चितळकर यांची बिनविरोध निवड; आमदार राहुल दादा कुल गटाचा दणदणीत विजय

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:
प्रतिनिधी’ | संजय पवार
पारगाव (ता. दौंड) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ. सुनिता विठ्ठल चितळकर यांची एकमताने व बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीमुळे आमदार राहुल दादा कुल यांच्या गटाला मोठे राजकीय यश मिळाले असून ग्रामस्थांमध्ये आनंदाचे व समाधानाचे वातावरण पसरले आहे.
पारगाव ग्रामपंचायतीची सत्ताधारी धुरा सध्या रमेश आप्पा गटाकडे असली तरी उपसरपंचपदासाठी आमदार राहुल दादा कुल गटाने आपली ताकद दाखवत सौ. चितळकर यांची बिनविरोध निवड सुनिश्चित केली. त्यांच्या उमेदवारीवर कुणीही हरकती न घेतल्याने त्यांची निवड निर्विवाद ठरली.
या प्रसंगी आमदार राहुल दादा कुल यांनी सौ. चितळकर यांचे मनःपूर्वक अभिनंदन करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. “गावाच्या सर्वांगीण विकासासाठी ही नवी जबाबदारी सौ. चितळकर निश्चितपणे यशस्वीरीत्या पार पाडतील,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
ग्रामपंचायत कार्यालयात पार पडलेल्या निवडणूक कार्यक्रमास ग्रामस्थ शहाजी हंडाळ, आनंदराव हाके, जालिंदर सूर्यवंशी, पोपट चितळकर, काकासो हंडाळ, आबा हंडाळ, विठ्ठल चितळकर आदी मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या निवडीनंतर पारगावच्या सर्वांगीण प्रगतीला चालना मिळेल, अशी आशा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे महिलांना या पदाच्या माध्यमातून नेतृत्वाची संधी मिळाल्याने महिला वर्गातही समाधानाचे वातावरण आहे.
संपादक:-विजयसिंह गायकवाड