मातकुळी (ता. आष्टी) येथे दलित तरुणावर जातीय अन्याय; गावगुंडांचा वडिलोपार्जित जमिनीवर बेकायदेशीर ताबा – पोलीस ठाण्याच्या दुर्लक्षामुळे संताप

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा
आष्टी :(प्रतिनिधी) मातकुळी (ता. आष्टी, जि. बीड) – तालुक्यातील मातकुळी या गावात सागर अश्रुबा लोंढे या दलित तरुणाच्या वडिलोपार्जित जमिनीवर गावातील एका जातीवादी प्रवृत्तीच्या गावगुंडाने बेकायदेशीर ताबा मिळवला आहे. विरोध केल्यावर सागर लोंढे यांना जातीवाचक शिवीगाळ करत धमकावण्यात आले असून, हा प्रकार थेट दलित समाजाच्या हक्कांवरचा घाला असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
तक्रार देऊनही पोलिसांकडून टाळाटाळ; दलित कुटुंब भयग्रस्त
सागर लोंढे यांनी या प्रकाराबाबत आष्टी पोलिस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलीस अधिकारी तक्रार घेण्यास तयार नव्हते. त्यांना रात्रभर पोलीस ठाण्यात थांबवले गेले, दुसऱ्या दिवशी केवळ जबाब नोंदवण्यात आला. आजतागायत एफआयआर नोंदवण्यात आलेला नाही. पोलिसांचा अजब खुलासा असा की, “डीवायएसपी साहेब रजेवर आहेत.”
दुसऱ्या बाजूला आरोपीस मात्र पोलिस ठाण्यात बोलावून दिलासा देण्याचा प्रकार घडल्याने पोलीस यंत्रणेवर अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.
कायदाच तोडला गेला – कलम 18(A) चे सर्रास उल्लंघन
अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यानुसार (SC/ST Act), कलम 18(A) मध्ये स्पष्ट नमूद आहे की, अशा प्रकारात प्राथमिक चौकशी करता येत नाही व तात्काळ एफआयआर दाखल करणे बंधनकारक आहे. मात्र या प्रकरणात आष्टी पोलिसांनी कायद्याचे थेट उल्लंघन केले आहे.
बीड जिल्ह्याचे एसपी पारदर्शक, पण त्यांच्याच कार्यकाळात दलितांवर अन्याय
बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक हे पारदर्शक आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात. मात्र त्यांच्या कार्यकाळातच मातकुळी गावात दलित व्यक्तीवर असा उघड उघड अन्याय होतो आहे, हे त्यांच्यासाठीच मोठे आव्हान आहे. आता प्रश्न असा आहे की – एसपी साहेब स्वतः यात लक्ष घालून अन्यायग्रस्त कुटुंबाला न्याय देतील का?
आंदोलनाचा इशारा
सागर लोंढे आणि त्यांच्या कुटुंबियांनी वरिष्ठ पोलीस अधिकारी, जिल्हाधिकारी आणि अनुसूचित जाती-जमाती आयोगाकडे निवेदन देण्याची तयारी केली असून, तातडीने कारवाई न झाल्यास उपोषण करण्याचा इशाराही दिला आहे.
🛑 हा प्रकार केवळ जमीन बळकावण्याचा नाही, तर संपूर्ण दलित समाजाच्या सुरक्षिततेवर आणि पोलीस यंत्रणेवरचा विश्वास डळमळीत करणारा आहे. यावर तातडीने कारवाई करण्यात यावी या प्रकरणाची माहिती सामाजिक कार्यकर्ते अंबादास शिंदे यांनी एसपींना मेसेजद्वारे कळवली असून, सामाजिक चळवळीची जाणीव असलेल्या शिंदे यांनी त्वरित लक्ष घालण्याची मागणी केली आहे. याच बरोबर दलित समाजातील विविध पक्ष व संघटना यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे