Uncategorized

सोलापुरातील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; सुसाइड नोटमधून महिला कर्मचाऱ्याचा उल्लेख, आरोपीला पोलीस कोठडी

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:

सोलापूर: शहरातील प्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉ. शिरीष वळसंगकर (वय ७०) यांनी त्यांच्या मोदीखान्यातील राहत्या घरी स्वतःवर गोळ्या झाडून आत्महत्या केल्याने वैद्यकीय क्षेत्रात खळबळ उडाली आहे. त्यांच्या आत्महत्येमागील कारण शोधताना पोलिसांच्या हाती एक सुसाइड नोट लागली असून, त्यामध्ये एका महिला कर्मचाऱ्याचा उल्लेख आढळून आला आहे.

सदर महिलेकडून सातत्याने होणाऱ्या त्रासाला कंटाळूनच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचलल्याचं सुसाइड नोटमध्ये नमूद करण्यात आलं आहे. संबंधित महिलेला पोलिसांनी अटक केली असून, तिला सोलापूर न्यायालयात हजर करण्यात आलं आहे. न्यायालयाने तिला तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

सदर महिला कर्मचाऱ्यांवर आर्थिक गैरव्यवहाराचा संशय होता. या प्रकाराची कुणकुण लागल्यावर तिला नोकरीवरून काढण्यात आलं होतं. त्यानंतर तिने डॉ. वळसंगकर यांना धमक्या देणे सुरू केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या दबावामुळेच डॉक्टरांनी आत्महत्या केल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे.

प्रकरणाचा तपशील:
आरोपी मनीषा माने या महिला कर्मचारी एसपी इन्स्टिट्यूट ऑफ न्यूरोसायन्स या डॉ. वळसंगकर यांच्या रुग्णालयात कार्यरत होती. तिने आर्थिक गैरव्यवहार केल्याची माहिती पुढे आल्यावर तिला संस्थेतून काढून टाकण्यात आले. यामुळे नाराज होऊन तिने डॉक्टरांवर मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न केल्याची माहिती मिळते.

सदर बाजार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजित लकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस तपास करत असून, न्यायालयात सरकारी वकील प्रशांत वनगिरी यांनी मनीषा माने हिची तीन दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती. न्यायाधीश दीपक कंखरे यांनी तिची कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सध्या सुरू आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button