रात्रपाळीत गस्त घालणाऱ्या पोलिसांनी घेतली लाच; तिघांवर निलंबनाची कारवाई

दिपसागर न्यूज ऑनलाइन पोर्टल सेवा
पुणे, (प्रतिनिधी) पाषाण – शहरात गुन्हेगारी नियंत्रणासाठी कार्यरत असलेल्या ‘कॉप्स २४’ योजनेअंतर्गत गस्त घालणाऱ्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांनी एका सोसायटीच्या अध्यक्षाकडून लाच घेतल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गंभीर दखल घेत गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांनी तिघा पोलिसांना तत्काळ निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.
निलंबित कर्मचाऱ्यांची नावे –
1. संतोष जगू शिंदे
2. प्रतीक महेश त्रिंबके
3. दिनेश संतोष इंगळे
घटनेचा तपशील –
१३ एप्रिल रोजी रात्री पाषाण येथील शिवालय सोसायटीत वाहनतळाचे काम सुरू होते. काम उशिरा सुरू झाल्याने आवाजाची तक्रार असल्याचे सांगत शिंदे, त्रिंबके व इंगळे हे तिघेजण गस्त घालत असताना घटनास्थळी पोहोचले. त्यांनी सोसायटीचे अध्यक्ष यांना बोलावून “आवाजाची तक्रार नियंत्रण कक्षाकडे आली आहे. तुम्हाला बालेवाडी पोलीस चौकीत यावे लागेल,” असे सांगितले.
यानंतर त्यांनी “काम लवकर पूर्ण करा, थोडे पैसे द्या,” असे सांगत पाच हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीत अध्यक्षांनी त्यांना तीन हजार रुपये दिले. याबाबत अध्यक्षांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल केली.
कारवाई –
तक्रारीनंतर खंडणी विरोधी पथकाने तिघा पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी केली. चौकशीत लाच घेतल्याचे स्पष्ट झाल्यानंतर संबंधित अहवाल उपायुक्त निखील पिंगळे यांना सादर करण्यात आला. त्यानंतर तिघांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.
‘कॉप्स २४’ योजना काय आहे?
पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या या योजनेचा उद्देश रात्रपाळीत गुन्हे रोखण्यासाठी गस्ती पथके तयार करून शहरभर तैनात ठेवणे हा आहे. मात्र, याच योजनेत काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनीच लाच घेतल्याने पोलिस दलाच्या प्रतिमेला गालबोट लागले आहे.
संपादक: विजयसिंह गायकवाड