महत्त्वाच्या काळात गैरहजर; पोलीस निरीक्षक अजित गावित निलंबित पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची कारवाई

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:
पुणे शहर–( प्रतिनिधी) पोलीस दलात शिस्तीचा भंग करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करत पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुन्हा एकदा स्पष्ट संदेश दिला आहे. पर्वती पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजित पोपटराव गावित यांना दीर्घकाळ विनापरवाना अनुपस्थित राहत कर्तव्यात कसूर केल्यामुळे अखेर निलंबित करण्यात आले आहे.
गावित यांनी १८ मार्च २०२४ ते २७ मे २०२४ या कालावधीत तब्बल ७१ दिवस रुग्ण रजेवर राहून अनुपस्थिती दर्शवली. या काळात धुलीवंदन, रंगपंचमी, शिवजयंती, रमजान ईद, डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती, रामनवमी, हनुमान जयंती तसेच लोकसभा निवडणूक २०२४ यांसारख्या महत्त्वाच्या सण, उत्सव आणि निवडणुकीचा कालावधी होता. पर्वती पोलीस ठाण्याचा कार्यक्षेत्र झोपडपट्टी व दाट लोकवस्तीचा असून अतिसंवेदनशील म्हणून ओळखला जातो. त्यामुळे अशा काळात वरिष्ठ अधिकारी म्हणून गावित यांची उपस्थिती अत्यावश्यक होती.
तथापि, २८ मे २०२४ रोजी केवळ एक दिवसासाठी कर्तव्यावर हजर राहिल्यानंतर, २९ मे २०२४ पासून ते आजतागायत कोणतीही परवानगी न घेता विनापरवाना अनुपस्थित आहेत. ही गंभीर बाब पोलीस प्रशासनाच्या निदर्शनास आल्यानंतर, पुणे शहर आयुक्त अमितेश कुमार यांनी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
या निर्णयामुळे पोलीस दलात पुन्हा एकदा शिस्त, कर्तव्यनिष्ठा आणि जबाबदारी यांना प्राधान्य देण्याचा स्पष्ट संदेश गेला आहे. कर्तव्यापासून पळ काढणाऱ्यांसाठी पोलीस दलात स्थान नाही, हे यामधून अधोरेखित झाले आहे.