तेलंगणात रस्ता अपघात; वरिष्ठ पोलीस उपायुक्त सुधाकर पठारे यांचे दुःखद निधन

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा:
मुंबई : मुंबई पोलिस दलातील वरिष्ठ अधिकारी आणि सध्या बंदर परिमंडळाचे उपायुक्त असलेले डॉ. सुधाकर पठारे यांचे तेलंगणामध्ये झालेल्या दुर्दैवी रस्ता अपघातात निधन झाले. ते आयपीएस प्रशिक्षणासाठी तेलंगणात गेले होते. प्रशिक्षणादरम्यान श्रीशैलम ज्योतिर्लिंग दर्शनासाठी जात असताना त्यांच्या वाहनाला बसची जोरदार धडक बसली. या अपघातात पठारे आणि त्यांच्या नातेवाईक भगवत खोडके यांचा मृत्यू झाला.
कर्तव्यदक्ष अधिकाऱ्याला मुकले मुंबई पोलीस
डॉ. सुधाकर पठारे हे २०११ बॅचचे आयपीएस अधिकारी होते. ते जानेवारी २०२५ पासून बंदर परिमंडळाचे उपायुक्त म्हणून कार्यरत होते. ठाणे पोलीस दलात परिमंडळ-४ मध्ये असताना बदलापूर लैंगिक अत्याचारप्रकरणी आरोपी अक्षय शिंदे याला अटक करण्यात त्यांचा महत्त्वाचा सहभाग होता. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच या गंभीर प्रकरणाचा तपास पूर्ण झाला होता.
अत्यंत अभ्यासू आणि कर्तव्यनिष्ठ अधिकारी
मूळचे वाळवणे (ता. पारनेर, जि. अहमदनगर) येथील असलेल्या डॉ. पठारे यांनी एम.एस्सी. (अॅग्री) आणि एलएलबी केले होते. प्रशासकीय सेवेत त्यांचा प्रवास अत्यंत उल्लेखनीय होता. १९९५ मध्ये ते जिल्हा विशेष लेखा परीक्षक झाले. त्यानंतर १९९६ मध्ये विक्रीकर अधिकारी, १९९८ मध्ये पोलीस उपअधीक्षक म्हणून निवड झाली आणि त्यांनी पोलिस दलात पदार्पण केले.
मुंबई पोलिस दलात शोककळा
डॉ. सुधाकर पठारे यांच्या अचानक निधनाने मुंबई पोलीस दलात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. एक कर्तव्यदक्ष, निष्ठावान आणि समर्पित अधिकारी गमावल्याचे पोलिस दलातील सहकाऱ्यांनी व्यक्त केले. त्यांचे योगदान आणि कार्य नेहमी स्मरणात राहील.