पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे बळ वाढणार; पुनर्रचनेचा निर्णय

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा
पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेचे बळ वाढणार; पुनर्रचनेचा निर्णय
पुणे : शहराच्या वाढलेल्या हद्दीचा आणि नव्याने सुरू झालेल्या पोलीस ठाण्यांचा विचार करून पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेची पुनर्रचना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या पुनर्रचनेअंतर्गत गुन्हे शाखेचे मनुष्यबळ वाढविण्यात येणार असून, सध्या कार्यरत असलेल्या ३६४ कर्मचाऱ्यांमध्ये आणखी २०० कर्मचाऱ्यांची भर पडणार आहे. त्यामुळे गुन्हे शाखेचे काम अधिक प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
गुन्हे शाखा ही पुणे पोलिसांची एक महत्त्वाची शाखा असून, गुन्हेगारांवर नजर ठेवणे आणि प्रतिबंधात्मक कारवाई करणे या जबाबदाऱ्या ती पार पाडते. सद्यस्थितीत शहरात ३९ पोलीस ठाणी असून, गुन्हे शाखेअंतर्गत सहा युनिट्स आणि खंडणी विरोधी पथक, अंमली पदार्थ विरोधी पथक, दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक अशा एकूण १२ पथकांचा समावेश आहे. शहरातील गुन्ह्यांचा समांतर तपास करण्याचे काम या शाखेच्या मार्फत केले जाते.
वाढलेल्या कार्यक्षेत्रामुळे पुनर्रचना अनिवार्य
गेल्या काही महिन्यांमध्ये शहराची हद्द वाढली असून, नव्याने सात पोलीस ठाणे कार्यान्वित करण्यात आले आहेत. परिणामी, गुन्हे शाखेच्या कार्यक्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. या वाढीचा विचार करून गुन्हे शाखेची पुनर्रचना केली जात आहे. तसेच, अतिरिक्त मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
तिन्ही पथकांना बंदोबस्ताची जबाबदारी नाही
शहरात सोनसाखळी चोरी, वाहनचोरी आणि घरफोडी यांसारख्या गुन्ह्यांचे प्रमाण मोठे असल्यामुळे गुन्हे शाखेने या गुन्ह्यांच्या नियंत्रणासाठी तीन स्वतंत्र पथके तयार केली आहेत. एका पथकात एक अधिकारी आणि आठ ते दहा कर्मचारी असतील. ही पथके संपूर्ण शहरात गस्त घालून अशा प्रकारच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी काम करणार आहेत. विशेष म्हणजे, या पथकांना कोणत्याही प्रकारच्या बंदोबस्ताच्या जबाबदाऱ्या देण्यात येणार नाहीत, जेणेकरून ते त्यांच्या कार्यावर पूर्ण लक्ष केंद्रित करू शकतील.
“गुन्हे शाखेची पुनर्रचना करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, वाढलेला विस्तार आणि नव्याने स्थापन झालेली पोलीस ठाणी यांचा विचार करून ही पुनर्रचना केली जाईल. तसेच, अतिरिक्त मनुष्यबळाचीही भर घालण्याचा प्रयत्न केला जात आहे.”
– शैलेश बलकवडे, अतिरिक्त पोलीस आयुक्त, गुन्हे शाखा