कोथरुडमध्ये फ्लॅटमध्ये जुगार अड्ड्यावर छापा! ११ जणांना अटक, रोकडसह साहित्य जप्त

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा
पुणे : कोथरुडमधील एका फ्लॅटमध्ये सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर पोलिसांनी छापा टाकत ११ जणांना अटक केली आहे. या कारवाईत जुगाराचे साहित्य आणि रोख ६०,९८० रुपये जप्त करण्यात आले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री कोथरुडमधील गुरुगणेशनगर येथे हा प्रकार उघडकीस आला. रमजान ईदच्या निमित्ताने गस्त घालत असताना पोलिसांना एका घरात पैशांवर जुगार खेळला जात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, सहाय्यक पोलीस निरीक्षक बालाजी सानप यांच्या पथकाने फ्लॅटवर छापा टाकला असता, टेबलावर पैशांचे गठ्ठे आणि पत्त्यांचे कॅट आढळून आले.
या प्रकरणी घरमालक निलेश आडकर, जुगार अड्डा प्रमुख गणेश दहीभाते यांच्यासह एकूण ११ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्यांमध्ये वकील, आर्किटेक्ट, बांधकाम व्यावसायिक आणि निवृत्त अधिकारी यांचा समावेश आहे. पुढील तपास कोथरुड पोलीस करीत आहेत.