भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याची मोठी कारवाई: अट्टल गुन्हेगार पियुष भरमवर एमपीडीए अंतर्गत कारवाई, पुणे पोलिसांची कठोर भूमिका”
अट्टल गुन्हेगार पियुष भरमवर एमपीडीए अंतर्गत कारवाई; नागपूर कारागृहात स्थानबद्ध

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा
पुणे शहर (प्रतिनिधी) : खुनाचा प्रयत्न, घातक शस्त्रे बाळगणे आणि धमकी देणे यांसारख्या गंभीर गुन्ह्यांमध्ये गुंतलेल्या अट्टल गुन्हेगारावर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी एमपीडीए कायद्यांतर्गत कठोर निर्णय घेत, त्याला पुढील एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध करण्याचे आदेश दिले आहेत.
गुन्हेगाराचे नाव व पार्श्वभूमी:
पियुष गणेश भरम (वय २२, रा. कचरावत चाळ, सिल्व्हर पार्क सोसायटी, आंबेगाव पठार) असे या गुन्हेगाराचे नाव असून, २०२२ पासून भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात त्याच्याविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद आहेत. वेळोवेळी प्रतिबंधक कारवाया करूनही त्याच्या वर्तनात कोणताही बदल झालेला नव्हता. तो अत्यंत क्रूर, भांडखोर आणि दहशत निर्माण करणारा व्यक्ती म्हणून ओळखला जातो. स्थानिक नागरिक त्याच्याविरुद्ध तक्रार करण्यासही घाबरत होते.
पोलिसांची कठोर कारवाई:
वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर यांनी पियुष भरमवर एमपीडीए कायद्यानुसार कारवाई करण्याचा प्रस्ताव सादर केला. त्याची तपासणी करून पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी त्याला नागपूर कारागृहात पाठवण्याचे आदेश दिले.
संघटित पोलिसी मोहीम:
भारती विद्यापीठ पोलिसांनी तत्काळ पियुष भरमला ताब्यात घेत त्याची नागपूर कारागृहात रवानगी केली. ही कारवाई पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त प्रविणकुमार पाटील, पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त राहुल आवारे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. यामध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षक सावळाराम साळगावकर, गुन्हे निरीक्षक राहुलकुमार खिलारे, सहायक पोलीस निरीक्षक विश्वास भाबड, पोलीस उपनिरीक्षक निलेश मोकाशी, तसेच पोलीस अंमलदार विशाल वारुळे, स्वप्निल बांदल, तात्या कुलकर्णी, मितेश चोरमोले, अभिनय चौधरी, सागर बोरसे, चंद्रकांत माने, निलेश ढमढेरे आणि अजय सावंत यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या कठोर कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.