आरोग्यमित्रांचा सरकारला अल्टीमेटम – 18 फेब्रुवारीपासून बेमुदत संपाची तयारी

दिपसागर न्यूज ऑनलाईन पोर्टल सेवा :
आरोग्यमित्रांचा लढा तीव्र होणार? 18 फेब्रुवारीपासून बेमुदत संपाची घोषणा
नाशिक (प्रतिनिधी) : महाराष्ट्रातील महात्मा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेत कार्यरत आरोग्यमित्र यांच्या विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी 18 फेब्रुवारी 2025 पासून राज्यभरात बेमुदत संप सुरू करण्याचा इशारा देण्यात आला आहे. सुरुवातीला 12 फेब्रुवारीपासून संप सुरू करण्याचा निर्णय घेतला गेला होता. मात्र, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण यांनी 7 फेब्रुवारी रोजी आरोग्यमित्रांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी बैठक आयोजित केली.
या बैठकीला राज्य आरोग्य हमी सोसायटीचे सीईओ अण्णासाहेब चव्हाण, डेप्युटी सीईओ विनोद बोंद्रे, सहाय्य संस्था (TPA) पदाधिकारी तसेच महाराष्ट्र आरोग्यमित्र कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी.एल. कराड, उपाध्यक्ष एल. आर. राव, कॉ. राहुल गायकवाड, कॉ. गणेश शिंदे, कॉ. किरण ढमढेरे व कॉ. वैशाली साखरे हे उपस्थित होते.
बैठकीत आरोग्यमित्रांच्या किमान वेतन, वार्षिक वेतनवाढ, रजा तसेच अन्य सुविधा यासंदर्भात सकारात्मक चर्चा झाली. आरोग्यमित्रांच्या मागण्यांवर निर्णय घेण्यासाठी सहाय्य संस्थेच्या (TPA) पदाधिकाऱ्यांनी दहा दिवसांचा वेळ मागितला, ज्यास राज्य आरोग्य हमी सोसायटीचे सीईओ अण्णासाहेब चव्हाण यांनी सहमती दर्शवली.
मागण्या न पटल्यास आरोग्यमित्रांचा संप; 18 फेब्रुवारीपासून कामबंद आंदोलन
संघटनेचे अध्यक्ष डॉ. डी.एल. कराड यांनी राज्यभरातील आरोग्यमित्र पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून संपाची तारीख 18 फेब्रुवारीपर्यंत पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. मात्र, 17 फेब्रुवारीपर्यंत मागण्यांचा सकारात्मक निर्णय न झाल्यास, 18 फेब्रुवारीपासून राज्यभरातील सर्व आरोग्यमित्र बेमुदत संपावर जाणार असल्याचा इशारा त्यांनी दिला आहे.
सरकारकडून सकारात्मक निर्णय होतो का, याकडे आरोग्यमित्रांचे लक्ष!
संपादक विजयसिंह गायकवाड