जागा विकत देतो म्हणून १० जणांना चार कोटी १६ लाख रुपयांचा गंडा; दोन महाठकांना ठोकल्या बेड्या

दिपसागर न्यूज ऑनलाइन पोर्टल सेवा: (संपादक विजयसिंह गायकवाड )
पुणे वाघोली – जागा विकत देतो म्हणून सुमारे दहा जणांची चार कोटी १६ लाख रुपयांची फसवणूक केल्या पकरणी खराडी पोलिसांनी दोन महाठकांना बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार कळताच अनेक जण हवालदिल झाले आहेत.
त्यांनी कित्येक जणांना अजून गंडा घातल्याची शक्यता खराडी पोलिसांनी व्यक्त केली आहे.
ईश्वर गहिनीनाथ बुधवंत ( वय ३३ वर्षे रा. एच ९४ फॉरिस्ट काउंटी सोसायटी, खराडी ), स्वप्निल बाळासाहेब पवार ( रा. पोंधवडी ता. इंदापुर जि पुणे ) असे फसवणूक करणाऱ्या दोघांची नावे आहेत. या प्रकरणी अविनाशकुमार लक्ष्मणकुमार बेहरा ( वय ३२ वर्षे, रा. केशवनगर ) यांनी फिर्याद दिली.
अन्य सहा जणांकडून सुमारे तीन कोटी पाच लाख रुपये घेवून त्यांची ही फसवणूक केली. मी पैसे ही देणार नाही व जागाही देणार नाही तुला काय करायचे ते कर अशी ईश्वर याने अविनाश यांना धमकी दिली. यानंतर त्यांनी पोलिसात फिर्याद दिली. या दोघांनी सुमारे १० जणांना गंडा घातल्याचे समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी, अक्षय आनंदकुमार ललगुणकर, संजय गोवर्धन कादे, हितेश अशोक गुमर असे स्वतःला घर बांधण्यासाठी वाघोली, खराडी, पुणे परिसरात जागा शोधत असताना त्यांची ओळख ईश्वर व स्वप्नील यांच्याशी झाली. या दोघांनी चौघांकडून रोख रक्कम, चेक, आर टी जी एस द्वारे सुमारे एक कोटी ११ लाख रुपये घेतले. त्यांना जागा देतो असे सांगितले. मात्र जागाही दिली नाही व पैसे ही परत दिले नाही.
मात्र या प्रकाराने वाघोली, खराडी परिसरात खळबळ माजली असून अजून अनेक जणांना त्यांनी गंडा घातल्याची शक्यता आहे. खराडी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय चव्हाण, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक राहुल कोळपे व पथकाने ही कामगिरी केली