माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर हल्ला; उपचाराचासाठी रुग्णालयात दाखल
राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर काटोल येथं हल्ला करण्यात आला.

दिपसागर न्यूज ऑनलाइन पोर्टल सेवा;
नागपूर :राज्याचे माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे नेते अनिल देशमुख यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात ते जखमी झाले आहेत. नरखेड येथील सांगता सभा आटपुन अनिल देशमुख हे काटोल येथे तीनखेडा भिष्णुर मार्गानं परत येत असताना काटोल जलालखेडा रोडवरील बेलफाट्याजवळ काही व्यक्तींनी त्यांच्या गाडीवर दगडफेक केली. दगडफेक कोणी केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. या हल्ल्यामुळं राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
अनिल देशमुख हे गंभीर जखमी झाले असून त्यांना पुढील उपचाराचासाठी काटोलच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अनिल देशमुख यांचे पुत्र सलील देशमुख काटोलमधून निवडणूक लढवत आहेत. त्यांच्या विरोधात भारतीय जनता पक्षानं चरणसिंग ठाकूर यांना उमेदवारी दिली आहे.
“राज्यात कायदा सुव्यवस्थेचे तीन तेरा वाजले आहेत. लोकशाहीचे धिंडवडे उडवले जात आहेत. याचे उदाहरण आज निवडणुकीच्या सांगता सभेवरून घरी परतताना अनिल देशमुख यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्यातून समोर आलं. या घटनेचा जाहीर निषेध करण्यात येत आहे,” अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षानं दिलीय