आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांचा पुणे दौरा गेम चेंजर ठरणार का?

दिपसागर न्यूज ऑनलाइन पोर्टल सेवा:
देवेंद्र फडणवीसांचं ‘मिशन पुणे’, ‘या’ नेत्यांच्या भेटीसाठी तातडीने रवाना, दौऱ्यामागचं नेमकं कारण काय?
देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर येण्याची शक्यता आहे. पुण्यात भाजपमधील नाराजांच्या भेटीगाठी फडणवीस घेणार आहेत. विधानसभा निवडणुकीचे तिकीट न मिळाल्याने भाजपचे अनेक जण नाराज होते, अशातच त्यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न फडणवीसांचा असेल
नाराज उमेदवारांच्या भेटीगाठी घेत फडणवीस पदाधिकाऱ्यांशी देखील संवाद साधणार आहेत. तसेच आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांचा दौरा महत्त्वाचा असणार आहे.
पुण्यात उच्छुकांची मंदियाळी
कसबा मतदारसंघामध्ये शहराध्यक्ष धीरज घाटे इच्छुक होते, मात्र त्यांना तिकीट मिळालं नाही. याशिवाय पर्वतीमधून माजी सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, कोथरूडमधून माजी नगरसेवक अमोल बालवडकर आणि शिवाजीनगरमध्ये माजी नगरसेवक सनी निम्हन पुणे कॅन्टोन्मेंटमधून माजी नगरसेवक डॉ भरत वैरागे इच्छुक होते. मात्र, फडणवीसांनी जवळच्या नेत्यांना तिकीट दिलं, असं असा आरोप केला जात होता. अशातच आता फडणवीसांचा दौरा भाजपसाठी गेम चेंजर ठरणार का? असा सवाल विचारला जात आहे.
दुसरीकडे वडगाव शेरी हा मतदारसंघ महायुतीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला गेल्याने या ठिकाणी विद्यमान आमदार सुनील टिंगरे यांना राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे. त्यामुळे या ठिकाणी निवडणुकीची तयारी करणारे माजी आमदार व भाजपचे माजी शहराध्यक्ष जगदीश मुळीक हे नाराज आहेत.
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपमध्ये शहरातील जवळपास सर्वच मतदारसंघांमध्ये इच्छुकांची मोठी संख्या होती. मात्र, पक्षाने विद्यमान आमदारांवरच विश्वास दाखवत त्यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे इतर इच्छुकांचा हिरमुड झाला होता. त्यामुळे अनेक नेते नाराज असल्याचं दिसून आलं होतं. अशातच आता फडणवीसांचा दौरा कारणी लागणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे.