Uncategorized

पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे मोक्का आरोपी पसार:पुण्यातील तीन पोलिस कर्मचारी निलंबीत

दिपसागर न्यूज ऑनलाइन पोर्टल सेवा;

पुणे-येरवडा पोलिस स्टेशनच्या पोलिसांनी पकडलेला मोक्का गुन्ह्यातील आरोपी निखिल कांबळे (वय-२८) हा पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे नजर चुकवून ससून रुग्णालयातून वैद्यकीय तपासणीवेळी २१ ऑक्टोबर रोजी पसार झाला. याप्रकरणी निष्काळजीपणा केल्याचा ठपका ठेवत पोलिस कर्मचारी सुशांत भोसले, विठ्ठल घुले व सुरज ओंबासे यांना पोलिस उपायुक्त हिंम्मत जाधव यांनी निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत.

आरोपी निखील कांबळे हा सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल आहे. भारतीय दंड संहिता कलम ३०९ (४) ३ (५) व महाराष्ट्र संगठित अपराध नियंत्रण अधिनियम १९९९चे अन्वये त्यावर मोक्का कारवाई करण्यात आली होती.

येरवडा परिसरातील एका ज्येष्ठ नागरिकास मारहाण करुन त्यास गंभीर जखमी करत लुटमार केल्याचा गुन्हा कांबळे याच्यावर होता. त्याला या गुन्ह्यात अटक केल्यानंतर पोलिस ठाण्यातून ससून रुग्णालयात वैद्यकीय तपासणीसाठी नेऊन पुन्हा येरवडा पोलिस ठाण्यात आणणे अपेक्षित होते. परंतु पोलिसांची गाडी गुंजन चौकात पोहोचल्यावर त्याने पोलिसांना अस्वस्थ वाटत असल्याचा बहाणा करुन पिण्यासाठी पाणी मागितले. त्यानंतर पोलिसांनी गाडी थांबवून एक पोलिस कर्मचारी त्याला पाणी आणण्यासाठी गेला. याच दरम्यान गाडीतील पोलिस चालकाकडून आरोपीने त्याची हातकडी उघडून घेतली. त्यानंतर हळूच नजर चुकवून तो गाडीचा दरवाजा उघडून पसार झाला. त्याचा पाठलाग पोलिस कर्मचाऱ्यांनी केला परंतु तो मिळून आला नाही.

दरम्यान, याप्रकरणी सदर तीन पोलिस कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केला तसेच शिस्तीचे पालन न केल्याने त्यांना निलंबित करण्याचा निर्णय वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी घेतला. योग्यप्रकारे दिलेली जबाबदारी पार न पाडल्याने आरोपी पसार झाला असा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. निलंबन काळात पोलिस कर्मचाऱ्यांना निम्मा पगार मिळणार असून कोणतेही खासगी कामे कर्मचाऱ्यांना करता येणार नाही. दरम्यान, पसार झालेल्या निखील कांबळे यांचा पोलिसांनी शोध घेऊन त्यास पुन्हा जेरबंद केले आहे. परंतु याप्रकारामुळे पोलिसांची प्रतीमा मलीन झाल्याचे सांगण्यात येत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button