Uncategorized

एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द; ५५ कोटींची सरकारकडे मागणी

दिपसागर न्यूज ऑनलाइन पोर्टल सेवा :विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महायुती सरकारने यंदाच्या दिवाळीत एसटीची हंगामी भाडेवाढ रद्द केली आहे. यामुळे महामंडळाला सुमारे १०० कोटी रुपयांचा कमी महसूल मिळणार आहे.

तर, एसटी कर्चमाऱ्यांना दिवाळी बोनस देण्यासाठी ५५ कोटी रुपयांच्या मागणीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे.

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना दिवाळी भेट रक्कम देण्यासाठी निधी कमी पडतो. पण इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांचीही दिवाळी गोड व्हावी यासाठी दिवाळीसाठी मिळणारी रक्कम तत्कालीन परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी सुरू केली. यासाठी हंगामी भाडेवाढ करण्याची योजना अंमलात आणली गेली व त्यातून कर्मचाऱ्यांना दिवाळी रक्कम भेटस्वरूपात देण्यात येत होती.

यंदा मात्र आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हंगामी भाडेवाढ रद्द करून प्रवाशांना दिलासा दिला आहे. यामुळे महामंडळाचे अंदाजे १०० कोटी रुपये नुकसान होणार असून ही रक्कम शासनाने एसटीला दिली पाहिजे, अशी मागणी आता महामंडळाने केली आहे. दिवाळी सण तोंडावर आला आहे. दिवाळी आनंदात साजरी करता यावी यासाठी सरकारने तत्काळ निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी महाराष्ट्र एसटी कर्मचारी काँग्रेसचे सरचिटणीस श्रीरंग बरगे यांनी केली आहे.

सध्या आणि खास करून सणासुदीच्या दिवसांत महामंडळाच्या बस प्रवाशांनी भरून जात असल्या, तरी प्रत्यक्ष एसटीच्या तिजोरीत अर्ध्यापेक्षाही कमी रक्कम पडते. यातून दैनंदिन खर्च भागविला जातो. प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या सवलत मूल्याची प्रतिपूर्ती सरकारकडून दिली जाते. परंतु मागील काही महिन्यांपासून सवलत मूल्याच्या प्रतिपूर्तीची पूर्ण रक्कम दिली जात नाही. त्या मुळे कर्मचाऱ्यांची देणी थकली आहेत.

फक्त पगार होईल एवढीच रक्कम महामंडळाला दरमहा शासनाकडून दिली जात आहे. आता दिवाळी बोनस देण्यासाठी महामंडळाला शासनाकडे हात पसरावा लागला आहे. यासाठी ५५ कोटी रुपयांच्या रक्कमेच्या मागणीचा महामंडळाने शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे.

 

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button